`देशात मंदी असती तर लोक जॅकेट आणि पँट घालून फिरले असते का?`
भारत हा खेड्यांचा देश आहे, शहरांचा नव्हे.
लखनऊ: देशात आर्थिक मंदीचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. अन्यथा देशातील लोक जॅकेट आणि पँट घालून फिरले असते का, असे अजब तर्कट भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनी मांडले आहे. ते रविवारी उत्तर प्रदेशच्या बलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकल्याचा दावा फेटाळून लावला.
त्यांनी म्हटले की, देशात आता मंदी असती तर आपण या कार्यक्रमाला कोट आणि जॅकेट नव्हे तर धोतर आणि सदरा घालून आलो असतो. एवढेच काय मंदी असती तर आपण पँट आणि पायजमा हे कपडे विकतच घेऊ शकलो नसतो, असे वीरेंद्र सिंह मस्त यांनी म्हटले.
'देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर मनमोहन सिंगांची मदत घ्या'
तसेच भारत हा खेड्यांचा देश आहे, शहरांचा नव्हे, असे वक्तव्यही त्यांनी केले. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकता ही शहरे म्हणजे भारत नव्हे. तर देशातील साडेसहा लाख गावे हा खरा भारत आहे. बँकिंग व्यवस्थेनेही ही बाब मान्य केली आहे. भारतातील बँकांमध्ये असलेला बहुतांश पैसा हा गावाकडील लोकांचा आहे, असा दावाही यावेळी वीरेंद्र सिंह मस्त यांनी केला.
महात्मा गांधी, के.बी. हेगडेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण यासारख्या नेत्यांना याच खेड्यांप्रती आत्मविश्वास वाटत होता. याच खेड्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, असेही यावेळी वीरेंद्र सिंह मस्त यांनी सांगितले.
वीरेंद्र सिंह मस्त यांनी यापूर्वीही वाहननिर्मिती क्षेत्रातील मंदीविषयी असाच अजब युक्तिवाद केला होता. वाहन क्षेत्रात मंदी असेल तर मग वाहतूककोंडी का होते?, असा सवाल त्यांनी विचारला होता.