नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी आर्थिक मंदीची कोणतीही चिन्हे नाहीत. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्थेत कधी मंदी येणारही नाही, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. त्या बुधवारी राज्यसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे नकारात्मक दावे पूर्णपणे फेटाळून लावले. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी मंदीचे कोणतेही सावट नाही, ती कधी येणारही नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस यूपीए-२ (२००९-२०१४) आणि एनडीए सरकारच्या काळातील (२०१४-२०१९) आर्थिक परिस्थितीची तुलना केली. यूपीए-२ च्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात महागाईचा दर कमी होता. तसेच आर्थिक विकासदरही जास्त असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. 



२००९-२०१४ या काळात देशात १८९.५ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. मोदी सरकारच्या काळात हेच प्रमाण २८३.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. तसेच यूपीए-२ च्या काळातील परकीय गंगाजळीचा आकडा ३०४.२ अब्ज डॉलर्स इतका होता. मोदी सरकारच्या काळात परकीय गंगाजळी थेट ४१२.६ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचल्याचेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.