बार्सिलोना दहशतवादी हल्ल्यात भारतीयांची हानी नाही- सुषमा स्वराज
सध्यातरी कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली नाही.
नवी दिल्ली : बार्सिलोनात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, स्पेनमधील भारतीय दूतावासासोबत त्या सतत संपर्कात असून यामध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली नाही. भारतीय दूतावासाकडून मिळालेले आपातकालीन क्रमांक स्वराज यांनी ट्वीट केले आहेत. ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''मी भारतीय दूतावासासोबत सतत संपर्कात आहे. सध्यातरी कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली नाही’.
स्पेन मधील बार्सिलोना शहरातील सिटी सेंटरमध्ये एका व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार यात १३ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० लोक जखमी झाले. बार्सिलोना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्यात ४ संशयित दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जुलै २०१६ मध्ये युरोपमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गाडीनेच लोकांना चिरडले होते. निस, बर्लिन, लंडन आणि स्टॉकहोममध्ये झालेल्या हल्ल्यात १०० हुन अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते.