साखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत रिटेल बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ४३ रूपये इतका आहे. जो गेल्या वर्षी याच काळात प्रतिकिलो ४० रूपये इतका होता. अर्थात सध्याची साखरेच्या दरातील वाढ ही किरकोळ आहे. मात्र, हा दर हळूहळू वाढत जाईल आणि दिवाळीत महागाईचे टोक गाठेल, अशी चर्चा होती. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत पासवान यानी साखरेच्या दराबाबत माहिती दिली.
पासवान म्हणाले, देशातील साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये साखरेचा कोणताच तुटवडा नाही. आवश्यक इतक्या साखरेचा सरकारकडे साठा आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात सरकार साखरेच्या किमती वाढू देणार नाही. साखरेचे दर स्थिर रहावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशात सुरू होत असलेला सण-उत्सवाचा काळ विचारात घेऊन साखरेचा साठा वाढविण्यासाठी सवलतीच्या दरात दक्षिणेकडून साखर उपलब्ध करण्यास सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहितीही पासवान यांनी दिली.
पासवान यांनी सांगितले की, देशात साखरेचा साठा २.७७ कोटी टन इतका आहे. या साठ्यात २०२६-१७ला २.०२ कोटी टनाचे उत्पादन, ५ लाख टन आयात तर, मागील वर्षांमधला शिल्लख ७० लाख टन साखरेचा समावेश असल्याचेही पासवान म्हणाले.