नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या केंद्रीय संस्थांनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी १० टक्के इतकी शुल्कवाढ केली जाते. मात्र, या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळ आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर यंदा ही शुल्कवाढ  न करण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

तसेच पीपीपी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या IIIT's संस्थांनीही शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, अशी विनंती आपण केल्याचे पोखरियाल यांनी सांगितले. सध्याच्या घडीला IIT सह देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मध्ये बी.टेकच्या अभ्यासक्रमासाठी वर्षाला साधारण दोन लाखांचे शुल्क आकारले जाते. 

या संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. याचा परिणाम नोकऱ्यांवरही होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच मद्रास आयआयटीमधील सहा विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट रद्द झाल्या होत्या. अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आयआयटीकडून नुकतेच स्पष्ट करण्यात आले होते.


यंदा कोरोनामुळे देशातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा रखडल्या आहेत. महाराष्ट्रातही शिक्षण मंडळाने कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केला होता. तसेच पहिली ते आठवी आणि अकरावी इयत्तेमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांकडून घेण्यात आला होता.