नवी दिल्ली: गरिबी निर्मुलनाचा प्रायोगिक सिद्धांत मांडल्याबद्दल अभिजित बॅनर्जी, इस्थर ड्युफ्लो आणि मायकल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या तिघांनी गरिबी निर्मुलनाच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने सांगितले. अभिजीत बॅनर्जी यांचे शिक्षण भारतामध्ये झाले असून ते सध्या अमेरिकेत राहतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजीत बॅनर्जी हे नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत. यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. कोलकाता येथील प्रेसिडेंसी आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) अभिजीत बॅनर्जी यांचे शिक्षण झाले आहे. विशेष गोष्ट म्हणजे अभिजीत बॅनर्जी आणि इस्थर ड्युफ्लो हे दोघे पती-पत्नी आहेत. हे दोघेही एमआयटी या संस्थेसाठी काम करतात. तर मायकेल क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ड्युफ्लो या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या सर्वात तरूण व्यक्ती ठरल्या आहेत.



या तिघांनी गरिबीशी निर्मुलनाचे खात्रीशीर मार्ग शोधून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यामुळे गरिबीसंदर्भातील समस्यांची लहानलहान भागांत विभागणी होऊन सहजपणे उकल करता येणे शक्य होईल. शिक्षण आणि बालआरोग्यासंदर्भातील या त्रयीने सुचविलेले उपाय अत्यंत परिणामकारक ठरल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.