`राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहण्याची एक टक्काही शक्यता उरलेली नाही`
अध्यक्षपदासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड करण्यापूर्वी कार्यकारिणीचे सदस्य पुन्हा एकदा जरूर भेटतील.
नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ते यापासून परावृत्त होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईल यांनी केले. ते शुक्रवारी 'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांना राहुल गांधींच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा मोईली यांनी म्हटले की, काँग्रेस कार्यकारिणी आता याबाबतचा निर्णय घेईल. काहीही घडू शकते. मात्र, राहुल गांधी स्वत:चा निर्णय बदलतील अशी एक टक्काही शक्यता मला वाटत नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड करण्यापूर्वी कार्यकारिणीचे सदस्य पुन्हा एकदा जरूर भेटतील, असे मोईली यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवानंतरही एकाही नेत्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच राज्यातील मुख्यमंत्री, महासचिव, प्रदेशाध्यक्षांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची हिम्मत दाखवली नाही, अशी खंत राहुल गांधी यांनी नुकतीच बोलून दाखवली होती. यानंतर काँग्रेसच्या १२० पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला. गुरुवारी रात्री काँग्रेसच्या विधी आणि माहिती अधिकार विभागाचे प्रमुख विवेक तन्खा यांनी आपला राजीनामा दिला होता. यानंतर हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशमधील अनेक नेत्यांनी धडाधड आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. या सगळ्यानंतर राहुल गांधी आपली टीम निवडून स्वतंत्रपणे कामाला सुरुवात करणार असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, विवेक तन्खा यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस पक्ष दीर्घकाळ अडथळे सहन करु शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी एक झुंजार पक्ष म्हणून काँग्रेसचे पुनरुज्जीवन करावे. त्यासाठी काँग्रेस पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची गरज आहे. जेणेकरून राहुल गांधी स्वत:ला हवे असलेले लोक निवडू शकतील, असे तन्खा यांनी सांगितले.