भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही-महाराष्ट्र गोमांतक पक्ष
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. पण गोव्यामध्ये मुख्यमंत्री बदल होणार नाही, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी कायम रहावेत असं मत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलय. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करण्याचा आनंद असून त्यांचं नेतृत्व आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलय. तर पर्रिकर मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत या सरकारला पाठिंबा आहे अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केलीय.
'मगोप'लाही हवेत पर्रिकर
जयललिता याही दीड वर्ष हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या सरकारचं काम सुरु होतं. मग पर्रीकर यांच्याबाबतीत हा प्रश्न का ? असा सवाल सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे. पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावर उपचार सुरु आहेत. अशावेळी राज्यात काँग्रेसला साथ द्यावी असा विचारही मनात आणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सुदिन ढवळीकर यांनी दिली.
विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही
आमच्या पक्षाचं भाजपात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव अजून आमच्याकडे अधिकृतरित्या आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आमच्या पक्षाच्या सेंट्रल कमिटीपुढे तो चर्चेसाठी ठेवला जाईल, असं सुदिन ढवळीकर म्हणाले.