नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं माहिती अधिकाराच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर 500 आणि हजाराच्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते, याची माहिती देखील देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती अधिकाराच्या 2005च्या कलम 7(9)नुसार माहिती दिली जाऊ शकत नाही. नोटा मोजण्याचं काम सातत्यानं सुरूच राहिल्यानं त्या कधीपासून मोजण्यास सुरुवात केली हे सांगू शकत नाही, असंही आरबीआय स्पष्ट केलं आहे.


नोटाबंदीनंतर जमा झालेल्या नोटा मोजण्यासाठी किती मशिन्स वापरण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळावी यासाठी १० ऑगस्टला माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. त्यात बँकांनी जुन्या नोटा मोजण्यासाठी उधारीवरसुद्धा कोणत्या मशिनी घेतल्या नव्हत्या हेही समोर आलं आहे. 


30 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार, 15.28 लाख कोटी म्हणजेच 99 टक्के 500 आणि 1000च्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या.15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी 16,050 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी 500 रुपयांच्या 1,716.5 कोटी रुपयांच्या नोटा आणि 1000च्या 685.8 कोटी नोटा चलनात होत्या. ज्यांची किंमत 15.44 लाख रुपये होती. तसेच नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते.