अलिगढ: अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणारे इतिहासकार इरफान हबीब यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अलिगढ न्यायालयातील वकील संदीप कुमार गुप्ता यांनी हबीब यांना नोटीस धाडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान हबीब यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात केलेले भाषण देशाची एकात्मता, विविधता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात होते. अमित शहा यांनी 'शहा' या फारसी आडनावाचा त्याग करावा, असे हबीब यांनी म्हटले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना मुस्लिमांवर हल्ले करण्यासाठीच झाली आहे. जिन्ना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला असतानाही तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर देशात फूट पाडल्याचा आरोप केलात असे आरोप नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहेत. आता या नोटीसला सात दिवसांमध्ये उत्तर द्यावे. तसेच माफीनामा प्रसिद्ध करावा, अशी मागणी याचिकाकर्ते संदीप कुमार गुप्ता यांनी केली आहे. 


देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरु असणाऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात केलेल्या भाषणात इरफान हबीब यांनी सरकारवर टीका केली होती. 



तत्पूर्वी कन्नूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या (अखिल भारतीय इतिहास अधिवेशन) अधिवेशनातही केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि इरफान हबीब यांच्यात व्यासपीठावर मतभेद झाले होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या भाषणादरम्यान काही जणांनी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मी आंदोलकांसमोर चर्चेचा प्रस्वात ठेवला. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यावेळी तुम्ही चर्चेचा मार्ग बंद केला तर हिंसा आणि द्वेषाचे वातावरण तयार होईल, असे मी म्हटले. तेव्हा इरफान हबीब माझ्यावर चाल करून आले. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना वेळीच रोखले. अन्यथा त्यांनी माझ्यावर हल्लाच केला असता, असे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले.