नवी दिल्ली : नाविन्याचा शोध घेण्यासाठी सुप्रसिद्ध असलेले संशोधक उद्योजक एलन मस्क सध्या न्यूरालिंक नावाचं नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतले आहेत. नेमका काय आहे हा नवा प्रयोग आणि मानव जातीला त्याचे काय फायदे होणार. मानवी मेंदूमध्ये कॉम्प्युटर चिप बसवण्याचा अफलातून प्रयोग सध्या अमेरिकेत सुरू आहे. इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन, वाहतुकीसाठी महासुपरफास्ट हायपरलूप तंत्रज्ञान असं एकापेक्षा एक भन्नाट संशोधन करणारे एलन मस्क... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या न्यूरालिंक नावाच्या कंपनीनं 2016 सालापासून मानवी मेंदूत कॉम्प्युटर चिप बसवण्याच्या दृष्टीनं संशोधन सुरू केला. सुरूवातीला एका माकडाच्या मेंदूमध्ये कॉम्प्युटर चिप बसवण्यात आली. त्यानंतर एका डुकराच्या मेंदूवरही संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यांच्या मेंदूत छोट्या नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चिप बसवण्यात आली होती. 



2021 वर्षाच्या शेवटापर्यंत कॉम्प्युटर चिप बसवण्यासाठी ह्युमन ट्रायल्स सुरू होणार आहेत. म्हणजे थेट माणसांवरच प्रयोग सुरू केले जाणार आहेत. अपघातानंतर अर्धांगवायूचा झटका बसलेल्या एका व्यक्तीनं आपल्यावर मानवी प्रयोग सुरू करावेत, अशी विनंती ट्विटद्वारे एलन मस्क यांना केली होती. 


त्याला उत्तर देताना, मस्क यांनी मानवी मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दिली. मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. 



शिवाय स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, अशी माहिती न्यूरालिंकमधल्या सूत्रांनी दिलीय. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या लोकांनी न्यूरालिंकमध्ये काम करावं, असं आवाहन एलन मस्क यांनी केलंय. दिवसागणिक  विज्ञाचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे.