नवी दिल्ली: २३ मे रोजी जनतेच्या न्यायालयातच चौकीदार चोर आहे किंवा नाही, याचा फैसला होईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. त्यांनी सोमवारी ट्विटवरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी 'चौकीदार चोर है' अशी टिप्पणी केली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालातून असा कोणताही अर्थ प्रतित होत नसल्याचे सांगत भाजपकडून राहुल यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयानेही यावर राहुल यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. या नोटीसला सोमवारी उत्तर देताना राहुल गांधी यांनी मी हेतूपूर्वक तसे म्हटले नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचे दाखवून दिले. त्यांनी म्हटले की, २३ मे रोजी कमळछाप चौकीदार चोर आहे किंवा नाही, याचा फैसला जनतेच्या न्यायालयातच होईल. हा न्याय होईलच. गरिबांकडून पैसे लुटून श्रीमंतांना देणाऱ्या चौकीदाराला शिक्षा मिळेल, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


राफेल कराराप्रकणी सर्वोच्च न्यायालयाने नव्या दस्तावेजांच्या आधारे पुनर्विचार याचिका स्वीकार केल्यानंतर राहुल गांधी यांनी हे प्रकरण 'चौकीदार चोर है' असा शब्दप्रयोग करत लोकांसमोर मांडले होते. मात्र, न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात तसे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे राहुल यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होईल.