मुंबई - व्हॉट्सऍप अलीकडच्या काळात मोबाईलधारकांसाठी परवलीचे ऍप बनले आहे. व्हॉट्सऍप माहिती नाही, असा मोबाईलधारक सापडणे दुर्मिळ म्हणायला हवे. व्हॉट्सऍपचा वापर वाढल्यामुळे आता या माध्यमातून लोकांना विविध सेवा-सुविधा देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बुकमायशोवर काढलेली तिकीटे प्रेक्षकांच्या व्हॉट्सऍपवर पाठवली जायला लागली. आता भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सने विमा पॉलिसीच्या पावत्या आणि क्लेम थेट तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सऍपवर पाठवायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास शेठ म्हणाले की, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून पॉलिसीची कागदपत्रे, प्रिमिअम पावत्या पाठविण्यास आम्ही सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून ग्राहकांना ही सेवा देणारी भारती एक्सा ही पहिलीच विमा कंपनी आहे. विमा पॉलिसीचा करार, पॉलिसीच्या नूतनीकरणाची कागदपत्रे, क्लेमसंदर्भातील माहिती व्हॉट्सऍपवर दिली जाईल. कंपनीकडून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. त्यापैकीच एक व्हॉट्सऍप असेल. यासह इतरही माध्यमातून आमचे प्रतिनिधी ग्राहकांपर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


तंत्रज्ञानावर आधारित संवाद आजच्या काळात खूप महत्त्वाचा झाला आहे. लोकही या पद्धतीच्या संवाद प्रक्रियेत पटकन सहभागी होतात. त्यामुळे ग्राहकांपर्यंत त्यांच्यासाठी महत्त्वाची असलेली कागदपत्रे लवकर पोहोचविण्यासाठी व्हॉट्सऍप महत्त्वाचे माध्यम आहे. आमच्या ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ सुविधा पुरविण्यासाठी आम्ही व्हॉट्सऍपचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.