...तर काढता येणार नाहीत पेन्शनचे पैसे; 1 फेब्रुवारीपासून बदलणार तुमच्या पेन्शनसंदर्भातील नियम!
NPS Partial Withdrawal: एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे.
NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस खातेधारक वैयक्तिक पेन्शन खात्यातून एम्प्लॉयर योगदानाव्यतिरिक्त 25 टक्के रक्कम काढू शकणार आहे. पण काही ठराविक परिस्थितीतच ही रक्कम काढता येईल.
नवा नियम काय?
आतापर्यंत खातेधारकांना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास, मुलांच्या लग्नासाठी, घर खरेदी, गृहकर्जाची परतफेड इत्यादींसाठीही आंशिक पैसे काढता येत होते. पण आता या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. तुमच्या नावावर किंवा तुमच्या जोडीदाराच्या नावावर आधीच घर असल्यास, तुम्ही दुसरे घर खरेदी करण्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे एनपीएसच्या रक्कमेवर तुम्ही घराचे प्लानिंग करत असाल तर नवे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
कोणत्या प्रसंगी पैसे काढाल?
गंभीर आजारांदरम्यान हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी आणि उपचाराच्या खर्चासाठी, अपघातामुळे वैद्यकीयदृष्ट्या अक्षमता किंवा अपंगत्व आल्यास, गंभीर आजाराच्या बाबतीत, रुग्णालयात दाखल करण्यासाठी किंवा उपचारांसाठी रक्कम काढता येते. यासोबतच व्यवसाय, स्टार्टअप, कौशल्य विकास किंवा कोणताही कोर्स सुरू करण्यासाठी तुम्हाला एनपीएसमधून पैसे काढता येणार आहेत.
पैसे कोण काढू शकतो?
किमान तीन वर्षे सदस्य असलेले खातेधारकच पैसे काढू शकतात. पेन्शन खात्यातून ग्राहकांच्या योगदानाच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. खातेधारकाला संपूर्ण सदस्यता कालावधीत जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढता येतात. या तिघांमध्येही किमान 5 वर्षांचे अंतर असावे. तुमच्या एकूण कॉंन्ट्रीब्युशनच्या 25 टक्क्यांहून अधिक रक्कम तुम्हाला काढता येत नाही.
पैसे कसे काढायचे?
पैसे काढण्यासाठी तुम्हाला याची प्रक्रिया माहिती असणे आवश्यक आहे.यासाठी कोणत्याही सरकारी नोडल एजन्सीकडे अर्ज करता येतो. कशासाठी रक्कम काढत आहात त्याचे स्व-घोषणा पत्र द्यावे लागेल. अर्ज आणि स्वघोषणा पत्र सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीकडे (सीआरए) द्यावे लागे. एजन्सीकडून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही केली जाते. खातेधारक आजारी असेल तर त्याचा नॉमिनी संबंधित अर्ज करु शकतो.
एनपीएसबद्दल
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेचा लाभ फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येत होता. पण 2009 नंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही या योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली. वयाच्या 60 वर्षांनंतर म्हणजेच निवृत्तीनंतर NPS मधून एकूण मॅच्युरिटी रकमेपैकी 60 टक्के रक्कम एकरकमी काढण्याची सुविधा खातेधारकांना देण्यात आली आहे. उर्वरित 40 टक्के रक्कम खातेधारकांना कोणत्यातकी मॅच्युरिटी रकमेच्या वार्षिकी योजनेत गुंतवावी लागते. ज्यातून त्यांना पुढे आयुष्यभप पेन्शन मिळत राहते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.