सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना, दिल्ली विद्यापीठात तणाव
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवू नये, असा आक्षेप `एनएसयूआय`कडून घेण्यात आला होता
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील विनायक दामोदर सावकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलीय. काँग्रेस प्रणित 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुतळ्याची विटंबना केलीय. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले होते. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवू नये, असा आक्षेप 'एनएसयूआय'कडून घेण्यात आला होता.
'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्ते सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत असतानाचे फोटोही व्हायरल झालेत. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासून चप्पलांचा हार घातला. 'भगत सिंह अमर रहे, बोस अमर रहे' अशी नारेबाजीही यावेळी करण्यात आली.
आरएसएसशी निगडीत 'एव्हीबीपी'च्या DUSU नं मंगळवारी आर्ट फॅकल्टीच्या बाहेर वीर सावरकर, भगत सिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा स्थापन केल्या होत्या. एनएसयूआयचा सावरकर आणि बोस यांच्या प्रतिमा एकाच स्थानावर उभारण्यावर आक्षेप होता. विद्यापीठ एबीव्हीपीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या प्रॉक्टर नीता सहगल यांनी DUSU च्या माजी अध्यक्ष शक्ती सिंह यांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस जारी केलंय. प्रशासनाकडून परवानगी न घेता विद्यापीठाच्या आवारात या तीनही प्रतिमा स्थापन करण्यासाठी २४ तासांत स्पष्टीकरण देण्यास त्यांना बजावण्यात आलं होतं. शक्ती सिंह यांचा DUSU च्या अध्यक्ष म्हणून २१ ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपुष्टात आलाय. पुढच्या निवडणुका १२ सप्टेंबर रोजी होणार आहेत.
दरम्यान, दिल्लीत सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून आलेत. सोलापूरमधील काँग्रेस भवन परिसरात सावरकर प्रेमी कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.