एकीकडे मंदीची झळ, दुसरीकडे देशभरात कोट्यधीशांची संख्या वाढली
वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ
मुंबई : एकीकडे मंदीची झळ बसतेय. तर दुसरीकडे देशभरात कोट्यधीशांची संख्या वाढली आहे. वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कोट्यधीशांची संख्या ९७ हजार ६८९ इतकी झाली आहे. तसंच आयकर परतावा भरणारे आणि करदाते यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नोकरदार वर्गात या वर्षातल्या करोडपतींची संख्या तब्बल ४९ हजार १२८ वर गेली आहे. गेल्यावर्षी हीच संख्या ४१ हजारांच्या घरात होती. १ कोटींवर उत्पन्न जाहीर करून कर भरणाऱ्यांची संख्या १.६७ लाखांवर गेली आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक जण कोट्याधीश झाले आहेत. राजस्व विभागाने शुक्रवारी करदात्यांचे संख्या आणि त्यांनी भरलेला कर याची माहिती दिली. २०१७-१८ मध्ये १ कोटीहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या ८१,३४४ होती.
आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात १९ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण ५.८७ कोटी लोकांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलं. ५.५२ कोटीहून अधिक व्यक्तिगत लोकं, ११.१३ लाख हिंदू अविभाजित कुटुंब, १२,६९ लाख फर्म आणि ८.४१ लाख कंपन्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरला.