नर्सने चुकीच्या ठिकाणी दिले इंजेक्शन, कापावा लागला तरुणीचा हात, लग्न ही मोडले
कानाच्या ऑपरेशनसाठी आलेल्या तरुणीला रक्तवाहिनीऐवजी चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात आले.
मुंबई : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर व्यक्ती आधीच घाबरलेला असतो. आजारपणामुळे माणूस आधीच खचलेला असतो. पण त्यात आणखी काही वेगळीच घटना घडली तर यामुळे रुग्णावर आणखी विपरीत परिणाम देखील होऊ शकते. असंच काही एका रुग्णालयात घडलं आहे. एका नर्सच्या चुकीमुळे तरुणीला आपला हात गमवावा लागला आहे. पण त्यामुळे तिचं लग्न ही मोडलं आहे.
पाटणा येथील कंकरबागमधील महावीर आरोग्य केंद्रातील नर्सचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. परिचारिकेच्या या निष्काळजीपणामुळे तरुणीचा हात तर गेलाच, पण नोव्हेंबरमध्ये होणारे तिचे लग्नही मोडले. 11 जुलै रोजी कानाच्या ऑपरेशनसाठी आलेल्या तरुणीला रक्तवाहिनीऐवजी धमनीत इंजेक्शन देण्यात आले, त्यामुळे रेखाचा हात हळूहळू निष्क्रीय होऊ लागला. तिने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना याबाबत सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही आणि उलट तिला रुग्णालयातून काढून टाकण्याची धमकी दिली.
यानंतर, IGIMS, AIIMS आणि PMCH च्या अनेक फेऱ्यांनंतर, 12 ऑगस्ट रोजी पाटणा येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये मुलीचे प्राण वाचवण्यासाठी ऑपरेशन करावे लागले. तरुणीचे वडील गेल्या 18 वर्षांपासून मानसिकदृष्ट्या अपंग आहेत.
या घटनेनंतर कुटुंबीय कंकरबाग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेले असता तेथेही नकार देण्यात आला.
गेल्या महिन्यात झारखंडमधून असेच एक प्रकरण समोर आले होते. जमशेदपूरमधील किटाडीह येथे राहणाऱ्या 16 वर्षीय काली शर्माच्या उपचारात निष्काळजीपणा समोर आला आहे. 21 जुलै रोजी त्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारींवरून परसुडीह येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग नर्सने रक्तवाहिनीऐवजी धमनीमध्ये इंजेक्शन दिले, ज्यामुळे धमनी ब्लॉक झाली आणि हात सुन्न झाला. यानंतर तातडीने टीएमएचमध्ये नेण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून त्यांना कोलकाता येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिचा हात कापला.