`न्याय` योजना नोटाबंदीचे नुकसान भरुन काढेल- राहुल गांधी
मोदी सरकारने पाच वर्षे निष्ठेने काम केले असते तर आतापर्यंत देशातली गरिबी संपली असती.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळे झालेले नुकसान काँग्रेसची न्याय (न्यूनतम आय योजना) योजना भरून काढेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अर्थव्यवस्थेला चालना आणि २० टक्के गरीब जनतेला अर्थसहाय्य असे दुहेरी लक्ष्य ही योजना साध्य करेल, असा दावाही यावेळी राहुल यांनी केला. न्याय योजनेची घोषणा केल्यावर भाजप हादरली आहे. मोदी सरकारने पाच वर्षे निष्ठेने काम केले असते तर आतापर्यंत देशातली गरिबी संपली असती. आम्ही नोटाबंदी किंवा जीएसटीसारखा उतावीळपणा केलेला नाही. ही योजना तयार करताना तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. ही रक्कम कुटुंबातील महिलेच्या खात्यात जमा होईल. देशातील २५ कोटी गरिबांना या योजनेचा लाभ होईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते. किमान उत्पन्न हमी योजना राबविण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.३ टक्के रक्कम खर्च करावी लागेल. तर हीच रक्कम १ लाख रुपये झाल्यास सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत २.६ टक्के रक्कम खर्च होईल. आर्थिक निकषांचा विचार करताही ही योजना व्यवहार्य असल्याचा दावा राहुल यांनी केला होता.