लठ्ठपणामुळं त्रासलेल्या महिलेने शस्त्रक्रिया केली पण घडलं भलतंच, ओढावला मृत्यू
Trending News In Marathi: लठ्ठपणावर मात करण्यासाठी एका महिलेने शस्त्रक्रियेचा मार्ग पत्करला मात्र, याच शस्त्रक्रियेमुळं तिला जीव गमवावा लागला आहे.
Trending News In Marathi: लठ्ठपणा ही आज वाढती समस्या आहे. वेळी-अवेळी जेवणे, बदलती जीवनशैली या सगळ्यांमुळं लठ्ठपणा व पोटाचा घेर वाढणे, वाढते वजन यासगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणाला त्रासलेल्या एका महिलेने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला आहे.
राजस्थानच्या मानसिंह रुग्णालयात ही घटना घडली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर आरोप केला आहे. तसंच, रुग्णालयातही मोठा गोंधळ घातला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचाही प्रयत्न निष्फळ ठरला. कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अचल शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी कमेटीची स्थापना केली आहे.
महिलेचा मृत्यू कसा झाला?
30 वर्षांची महिला लठ्ठपणा आणि इतर समस्यांसाठी रुग्णालयात आली होती. १५ दिवसांपूर्वी ती रुग्णालयात आली होती. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. महिलेला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार रुग्णालयात मंगळवारी महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती अचानक खालवली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचे म्हणणे काय?
शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती अगदी उत्तम होती. उपचारांनंतर तिला श्वास घेण्यास अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर महिलेला आयसीयूत भरती करण्यात आले. डॉक्टरांकडून कोणताही हलगर्जीपणा करण्यात आला नाहीये. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसारच या प्रकरणात कोणती हलगर्जी झाली आहे की नाही हे स्पष्ट होईल, असं एसएमएस रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अचल शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लठ्ठपणा ही गंभीर समस्या जरी असली तरी त्यावर डाएट किंवा नैसर्गिक पद्धतीने मात करता येऊ शकते. योग्य पद्धतीने लठ्ठपणावर मात करता येऊ शकते.