Odhisha Train Accident : "यामध्ये माझा मुलगा नाहीये....माझा मुलगा होता...कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होता. मी सर्व मृतदेह पाहिले, पण माझा मुलगा नाही सापडला...मला कळत नाहीये मी काय करू..." जमीनीवर पडलेल्या त्या मृतदेहांकडे बोट दाखवत ते बोलत होते. कंठ दाटून आला होता, डोळे पाणावले होते...पुढे काय करावं, ही काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिसा बालासोर रेल्वे अपघाताने संपूर्ण भारत हादरलाय. गेल्या 2 दशकांपासून भारतातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जातोय. ओडिशातल्या बालासोरमधल्या भीषण रेल्वे अपघातात तब्बल 288 लोकांना जीव गमवावा लागला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोणी मृत्यूशी झुंजतंय, कोणी आपल्या प्रिय व्यक्तीला घेऊन रूग्णालयात धावतंय तर कोणी मृतदेहांच्या ढिगाऱ्यात आपल्या व्यक्तीला शोधतंय. 


अशीच काहीशी परिस्थिती झालीये एका बापाची. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका खोलीत मृतदेहांचा खच पडलाय. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेताना दिसतेय. कपड्यांनी हे मृतदेह झाकण्यात आलेत. यावेळी हा व्यक्ती  प्रत्येक मृतदेहाचा चेहरा पाहून ओळख पटवण्याचा प्रयत्न करतोय. 


गेल्या अनेक तासांपासून हा व्यक्ती त्याच्या मुलाचा शोध घेतोय. अजून त्याच्या मुलाचा मृतदेह काही त्यांना सापडला नाहीये. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्यांना विचारतेय की, तुम्ही काय करताय. यावर ते उत्तर देतात की, माझा मुलगा होता, कोरोमंडल ट्रेनमध्ये. मी भद्रक जिल्ह्यात राहतो. माझा मुलगा अजून सापडला नाहीये. मी पोलिसांना सांगितलंय, मात्र अजून कोणी काहीच सांगत नाहीये. या मृतदेहांमध्ये माझा मुलगा नाहीये. 


मुलाला शोधण्यासाठी या बापाने प्रत्येक प्रेताचा चेहरा उघडून पाहिला. एक चेहरा पाहिल्यानंतर तो बंद कारायचा आणि पुढील मृतदेहाचा चेहरा पाहायता. काळीज पिळवटून टाकणारा तो क्षण तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल.


केंद्र सरकार अलर्ट मोडवर


या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने अपघातस्थळी मदतकार्याची पाहणी केली. शिवाय शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनास्थळाची पाहणी केलीये. हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


दरम्यान ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी, घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.