मुंबई : बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आणखी तीव्र होत आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत हे अत्यंत भयंकर चक्रीय वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच समुद्रामध्ये उंच लाटा देखील उसळू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंगपूर, गजपती, नायगड, कटक, केंद्रपारा, खुर्दा आणि पुरी या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूमध्ये ही अम्फानचा धोका वाढला आहे. येथे रविवारी जोरदार वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली आणि बरेच नुकसान झाले. कोयंबतूरसह अनेक जिल्ह्यात झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे.


चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सुमारे 11 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. याशिवाय ओडिशामध्ये चक्रीवादळाच्या परिणामानंतर लवकरच वीज, पाणीपुरवठा, रस्ते स्वच्छता, बचाव व मदतकार्य सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


'अम्फान' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 17 पथके तैनात केली आहेत आणि अनेकांना सज्ज ठेवले आहे. एनडीआरएफच्या एका दलात सुमारे 45 सदस्य असतात.


एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटलंय की, 'एनडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि आम्ही राज्य सरकार, हवामान विभाग आणि संबंधित एजन्सींच्या संपर्कात आहोत.'


एनडीआरएफची 7 पथके पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आली आहेत. पुरी, जगतसिंगपूर, केंद्रापाडा, जाजपूर, भद्रक, बालासोर आणि मयूरभंज पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, हावडा आणि हुगळी या जिल्ह्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आले आहे.