Balasore Train Accident: ओडिशातल्या बालासोरमध्ये (Balasore) शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. रेल्वेच्या एकाच मार्गावर तीन ट्रेन धडकल्याने झालेल्या या अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू (288 Dead) झाला तर नऊशेहून अधिक प्रवासी जखमी झाले. एनडीआरएफ (NDRF) आणि ओडीआरएएफच्या (ODRAF) जवानांनी स्थानिक पोलिस आणि विविध सामाजिक संस्थ्यांच्या मदतीने बचावकार्य राबवलं. अनेक प्रवाशांचा जीव वाचवण्यात आला. बचावाकार्याच्या दोन दिवसांनंतर एनडीआरएफचे संचालक अतुल करवाल यांनी मीडियाला माहिती दिली. 48 तासांनंतर अपघातात कोणी जीवीत सापडेल याची शक्यता कमी आहे, असं त्यांनी सांगितलं. पण म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

48 तासांनंतर तो जीवंत सापडला
दुर्घटनेच्या 48 तासांनंतरही केंद्रीय आणि राज्याच्या एक हजाराहून अधिक जवानांनी शोध मोहिम सुरु ठेवली आहे. शोध घेत असातनाच काही जवानांना अपघातापासून काही अंतरावर असलेल्या एका झुडपातून खोल गेलेला आवाज ऐकू आला. कोरोमंडल एक्स्प्रेसचे (Coromandal Express) डबे पलटी झाल्याने काही प्रवासी दूरवर फेकले गेले. यातलाच एक प्रवासी झुडपात अडकला. त्या व्यक्तीचा आवाज खूप क्षीण झाला होता. गेल्या दोन दिवसात जवानांनी दुर्घटनेपासूनच्या आसपासच्या परिसरात शोध घेतला होता. 


पण दोन दिवसांनी शोधमोहिमेत हा व्यक्ती एका झुडपात आढळून आला. जवानांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला झुडपातून बाहेर काढलं. यानंतर त्याला उपचारासाठी बालासोर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


पाच लोकांबरोबर करत होता प्रवास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 35 वर्षांचा हा तरुण आसाममधला रहिवासी असून त्याचं नवा दुलाल मुझूमदार असं आहे. तो आपल्या पाच मित्रांसह कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करत होता. त्याच्याबरोबर प्रवास करणारे इतर पाच जण जिवंत आहेत की नाही याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दुलाल मुझूमदार हा तरुण कोरोमंडल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. अपघात झाला त्यावेळी तो ट्रेनच्या बाहेर फेकला गेला आणि झुडपात अडकला. इतक्या भीषण अपघातातून 48 तासांनंतरही तो जीवंत राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुलाल मुझूमदारची प्रकृती गंभीर असून अद्याप तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. 


बचावपथकाला सतावतेय भीती
दरम्यान, हा रेल्वे अपघात इतका भीषण होता की काही लोकांच्या अंगाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या. काहींचे हात, तर काहींचे पाय निखळले होते. बचावपथकातले जवान दोन दिवसांनंतरही ती घटना विसरू शकत नाहीएत. अनेक जवानांची झोप उडाली आहे. त्यांच्या मनावर खोल परिणाम झाल्याचं काही जवानांनी सांगितलंय.