Odisha News : गेल्या काही काळापासून हृदयविकाराच्या (heart attack) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतान दिसत आहे. समोरुन अगदी निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा क्षणात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत आहेत. कधी व्यायाम करत असताना तर कधी नाचत असताना देखील हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. असाच काहीसा प्रकार ओडिशात (Odisha News) घडलाय. भुवनेश्वरला जाण्याच्या एका बसच्या चालकाला (Bus Accident) अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. अशा परिस्थितीतही या चालकाने कशाचीही पर्वा न करता बसमधल्या सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशामध्ये फुलबनीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या बसच्या चालकाला चालत्या बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला. मात्र त्याने प्रसंगावधान दाखवत बस वळवून भिंतीवर आदळली. त्यामुळे बस थांबली आणि बसमधील 48 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मात्र या घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला आहे.


शुक्रवारी रात्री कंधमाल जिल्ह्यातील पाबुरिया गावाजवळ ही घटना घडली. सना प्रधान असे बसच्या चालकाचे नाव आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालवत असताना अचानक बस चालकाच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. यादरम्यान त्याने स्टेअरिंग एका भिंतीकडे वळवले त्यामुळे बस त्याच्यावर आदळली आणि थांबली. बसचालकामुळे मोठा अपघात टळला कारण यामध्ये 48 प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर बस चालकाला रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन बस चालकाला मृत घोषित केले.


टिक्काबली पोलीस ठाण्याच्या प्रभारी कल्याणमयी सेंधा यांनी सांगितले की, 'त्याला पुढे गाडी चालवता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळवली. त्यानंतर वाहन थांबले आणि प्रवाशांचे प्राण वाचले. 'मां लक्ष्मी' ही खासगी बस साधारणत: दररोज रात्री कंधमालमधील सारंगढ येथून उदयगिरी मार्गे राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वरला जाते. या घटनेनंतर बस चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले. यानंतर दुसरा ड्रायव्हर बसमध्ये चढला आणि काही वेळाने ती आपल्या प्रवासाकडे निघाली.' प्रधान यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.