Delhi to Bhubaneswar Flight Tickets: ओडिशामध्ये (Odisha) बालासोर येथे झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातासंदर्भात देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतरचं बचाव कार्य 48 तासांनंतरही सुरुच आहे. अपघातग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे येत असतानाच या संकटकाळात विमान कंपन्या मात्र आर्थिक फायदा करुन घेत असल्याचं दिसत आहे. या भीषण ट्रेन अपघातानंतर दिल्ली- भुवनेश्वर विमान प्रवासाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. अपघातापूर्वी ज्या दराला या मार्गावरील विमान तिकीटं उपलब्ध होती त्याच्या 10 टक्के अधिक रक्कमेला विमान तिकीटं विकली जात आहेत. हा मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याचं मत प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. 


किती आहे तिकीट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालासोर येथे शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेस (Coromandel Express) आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचा (Bengaluru-Howrah Superfast Express) एका मालगाडीसोबत भीषण अपघात झाला. या अपघातापूर्वी 5 ते 8 हजार रुपयांना उपलब्ध होत असलेल्या दिल्ली- भुवनेश्वर फ्लाइट तिकीटांचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या म्हणजेच या भीषण अपघातानंतर दिल्ली- भुवनेश्वर विमान तिकीटाच्या दरांनी 50 हजारांहून अधिकचा टप्पा ओलांडला आहे. विमान कंपन्यांनी दिल्ली- भुवनेश्वर मार्गावरील तिकीटांचे दर वाढवले आहेत. 4 जून 2023 रोजी दिल्ली-भुवनेश्वर मार्गावर विमानांचं सर्वात स्वस्त तिकीट हे 25 हजार 474 रुपये इतकं असल्याचं ऑनलाइन बुकींगमध्ये दिसत आहे. तसेच या मार्गावरील सर्वात महागडं तिकीट 85 हजार 324 रुपये इतकं असल्याचं दिसत आहे.


5 जूनचीही अशीच परिस्थिती


5 जूनसाठीच्या विमानांसाठीही अशीच परिस्थिती आहे. सामान्य दरांपेक्षा दीड ते दोन पट अधिक किंमत या तिकीटांसाठी आकारली जात आहे. 5 जूनचं सर्वात स्वस्त तिकीट 13 हजार 163 रुपयांना उपलब्ध आहे. तर याच मार्गावरील सर्वात महाग तिकीट 63 हजार 589 रुपये इतकं आहे. 


मंत्रालयाकडून विमान कंपन्यांना इशारा


विमान कंपन्यांना यासंदर्भात नागरिक उड्डाण मंत्रालयाने इशारा दिला आहे. वेगवेगळ्या शहरांमधून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये असामान्यपद्धतीने दरवाढ करु नये असं मंत्रालयाने कंपन्यांना सांगितलं आहे. तसेच कंपन्या असं करताना आढळून आल्यास कारवाईही केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. मात्र यानंतरही विमान कंपन्या मनमानी पद्धतीने दरवाढ करत अधिक किंमतीला तिकीटं विकत असल्याचं दिसत आहे.


नक्की वाचा >> Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?


पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडून पहाणी


दरम्यान, ओडिशामधील ट्रेन अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. दोषींना कठोर शासन केलं जाईल असं पंतप्रधानांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर म्हटलं.