कधीही पाहिलं नसतील इतकी कासवं; समुद्राच्या दिशेनं जातानाची दृश्य भारावणारी
कासवाचे बहुविध प्रकार. इथं दिसणारा प्रकार तुम्ही ओळखला का?
मुंबई : ओडिशातल्या गहिरमाथा समुद्री अभयारण्यात असणाऱ्या विविध बेटांवरील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने काही खास पाहुणे दिसले. हे पाहुणे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही पाहिलेही नसतील.
समुद्राच्या दिशेनं निघालेले हे इवलेसे पाहुणे म्हणजे लहानगी कासवं. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्लं नुकतीच ओडिशातील समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळाली.
मुळची श्रीलंकेतली ऑलिव्ह रिडले कासवं दरवर्षी ओडिशाच्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. ही कासवाची पिल्लं त्यांच्या घरट्यांकडून समुद्रात प्रस्थान करताना दिसतात. यावेळीही साधारण महिन्याभरापूर्वी या कासवांनी अंडी घातली आणि त्यानंत आता त्या अंड्यांतून असंख्य पिल्लं बाहेर आली आहेत.
कासवांच्या अंड्यातून बाहेर येण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिथं सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. श्वान, गीधाडं, शिकारी पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रण्याकडून अथवा मनुष्याकडून कासवांना हानी पोहोचता कामा नये, हाच यामाचचा मुख्य हेतू होता.
इथं रंजक गोष्ट अशी, की 20 वर्षांचं झाल्यानंतर कासव पुन्हा त्यांच्या जन्मस्थळ असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर परततं. तेव्हा आता ही जन्मलेली कासवं 20 वर्षांनंतर बराच प्रवास करुन त्यांच्या या जन्मस्थळी येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.