Coromandel Express Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोरमधील भीषण अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भातील तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शनिवारी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. तसेच या प्रकरणातील कोणत्याही दोषींना सोडलं जाणार नाही, त्यांना कठोर शासन केलं जाईल असा शब्द पंतप्रधानांनी दिला. दरम्यान या अपघाताच्या वेळेस नेमकी सिग्लची आणि घटनास्थळावरील रेल्वे लाइनची स्थिती काय होती यासंदर्भातील माहिती देणाऱ्या रेल्वे ट्रॅफिक ट्रॅकिंगसंदर्भातील तपशील समोर आला आहे. 


ट्रॅकिंग सिस्टीमची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या वाहतुकीसंदर्भातील देखरेखीसाठी वापरल्या जाणाऱ्या यार्ड लेआऊटमध्ये रेल्वे ट्रॅक इंटरसेक्शनवरील (रेल्वे रुळ एकमेकांना छेदतात ती जागा) या अपघातग्रस्त ट्रेनसची स्थिती काय होती हे दिसत आहे. अपघात झाला त्यावेळेस तिन्ही ट्रेन नेमक्या कोणत्या ट्रॅकवर होत्या हे या ट्रॅकिंग सिस्टीममध्ये दिसत आहे. 


यामधून नेमकं काय स्पष्ट होतंय?


या ट्रॅकिंग मॅपमध्ये मध्यभागी दिसणारा ट्रॅक हा 'अप लाइन' आहे. या ट्रॅकवर शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेस येत होती अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. तर या ट्रॅकच्या बाजूच्या 'डीएन मेन' ट्रॅकवरुन बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस जाणार होती. कोरामंडल एक्सप्रेस ट्रॅकवरुन घसरली आणि बाजूच्या ट्रॅखवरील मालगाडीला या ट्रेनचे घसरलेले काही डब्बे धडकले. तर काही डब्बे बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस येत असलेल्या 'डीएन मेन' ट्रॅकवर पडले. त्यामुळेच अत्यंत वेगाने येणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस याच ट्रॅकवर पडलेल्या कोरामंडल एक्सप्रेसच्या डब्ब्यांना धडकली. या डब्ब्यामधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.



लूप लाइन म्हणजे काय?


मात्र अपघातानंतर जी दृष्य समोर आली आहेत त्यामध्ये कोरामंडल एक्सप्रेसचं इंजिन थेट मालगाडीच्या डब्ब्यावर चढल्याचं दिसत असल्याने काही तज्ज्ञांनी कोरामंडल एक्सप्रेस थेट मालगाडीला धडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा अपघात 'लूप लाइन'मध्ये घडल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 'लूप लाइन' हा राखीव ट्रॅक असतो. जेव्हा एकाच वेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन्सची संख्या अधिक असते तेव्हा काही ट्रेन्सला 'लूप लाइन'वरुन काही अंतरासाठी मार्ग मोकळा करुन दिला जातो किंवा ही लाइन मालगाड्यांसाठी तात्पुरती साईडींग ट्रॅक म्हणून वापरली जाते. याच लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला कोरामंडल एक्सप्रेस थेट धडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरामंडल एक्सप्रेस अचानक लूप लाइनवर कशी गेली याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. 



गाडी लूप ट्रॅकवर गेलीच कशी?


काही प्रसारमाध्यमांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिलेल्या वृ्त्तानुसार कोरामंडल एक्सप्रेसला हिरवा सिग्नल देण्यात आला होता. मात्र हा हिरवा सिग्नल 'लूप लाइन'वरुन जाण्यासाठी होता जिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. या प्रकरणातील सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील असं सुत्रांनी सांगितलं आहे. कोरामंडल एक्सप्रेस 'लूप लाइन'वर कशी गेली? हा तांत्रिक बिघाड होता, मानवी चुकी होती की घातपात घडवण्याच्या दृष्टीने हे जाणूनबुजून करण्यात आलं यासंदर्भातील तपास केला जाणार आहे.