महिलांच्या हाती OLA ची धुरा; 10 हजार पदांसाठी भरती
10 हजार महिलांना नोकरीची संधी
मुंबई : मागील काही काळापासून ऑटो क्षेत्रात सातत्यानं प्रगती करणाऱ्य़ा Ola Electric कडून आता एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणून कंपनीनं अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
कंपनीच्या तामिळनाडू प्लांटमध्ये या नव्या पर्वाची सुरुवात करण्यात येणार असून, त्याअंतर्गत तब्बल 10 हजार महिलांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. इथं शून्यापासून सर्व जबाबदारी ही महिलांच्याच हाती असणार आहे. कंपनीचे सह- संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार या प्लांटचं संचालन महिलाच करणार आहेत.
10 हजार महिलांना नोकरीची संधी
OLA चे सीईओ, भाविश अग्रवाल यांनी आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज असल्याचं म्हणत ओलाला तामिळनाडूतील प्लांट एकुलता एक मोटर वेहिकल प्लांट असेल, ज्याची धुरा सर्वस्वी महिलांच्या हाती असणार आहे. इथं 10 हजार महिलांना नोकरीची संधी मिळणार आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि अधिक सर्वसमावेशक वर्कफोर्स तयार करण्यासाठी हे आमचं पहिलं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली.
फक्त महिलांना वर्कफोर्समध्य़े समान संधी मिळाल्यामुळं देशातील GDP मध्ये 27 टक्के वाढ होऊ शकते अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान OLA नं 2020 या वर्षात तामिळनाडूमध्ये पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर प्लांटमध्ये 2400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. जिथं सुरुवातीच्या काळात 10 लाखांच्या क्षमतेनं उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. ज्यानंतर मागणीनुसार उत्पादन वाढवण्यात येणार आहे.