`Omicron सगळ्यांना मारून टाकेल...` म्हणत घाबरलेल्या डॉक्टरनं बायको-मुलांना संपवलं
सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पोहोचला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला धक्का बसला.
कानपूर : Omicron या कोरानाच्या नवीन प्रकारामुळे जगभरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. एवढंच काय तर भारतात देखील याचे रुग्ण सापडले आहेत. बंगळुरू येथील 46 वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले. स्वत: ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले परंतु त्यांनी न घाबरता ते सेल्फ-आयसोलेशनमध्ये गेले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, कानपूरमधील एका डॉक्टरने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची इतकी धास्ती घेतली की, त्याने आपले कुटुंब संपवले. ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी हृदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'ओमिक्रॉन हा सगळ्यांना मारेल.'
या डॉक्टरने आपल्या बायकोची हातोडीने हत्या केली आणि मुलगा आणि मुलीचा गळा दाबून मारून टाकले. डॉक्टरने त्याच्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली. त्यानंतर तो डॉक्टर घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळावरून पोलिसांना सापडलेल्या डायरीत लिहिलं आहे की, 'आता आणखी कोविड नाही. हा कोविड सर्वांचा जीव घेईल. यापुढे मृतदेह नाही मोजायचे.'
ते दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले
कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिव्यता अपार्टमेंटमध्ये राहणारा डॉक्टर सुशील रामा रुग्णालयात काम करतात. ते पत्नी चंद्रप्रभा (48), मुलगा शिखर (18) आणि मुलगी खुशी यांच्यासोबत राहत होते. शुक्रवारी संध्याकाळी डॉक्टर सुशील कुमारने पत्नीसह मुलगा आणि मुलीची हत्या केली. डॉक्टर सुशील कुमार यांनी भाऊ सुनीलला मेसेज केला होता की, पोलिसांना कळवा, मी डिप्रेशनमध्ये आहे. या मेसेजनंतर जेव्हा सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पोहोचला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला धक्का बसला.
'...आणि मृतदेह मोजू नका'
खोलीतून सापडलेल्या डायरीत लिहिले आहे, 'कोविड नाही. तर आता हा ओमिक्रॉन सर्वांना ठार मारेल. यापुढे मृतदेह मोजता येणार नाहीत. माझ्या निष्काळजीपणामुळे मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर अडकलो आहे, जिथून बाहेर पडणे अशक्य आहे. मला भविष्य नाही. म्हणून, माझ्या इंद्रियांमध्ये मी माझ्या कुटुंबाचा नाश करून स्वतःचा नाश करत आहे. याला अन्य कोणी जबाबदार नाही.'
'...माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही'
त्याने लिहिलेल्या या नोटमध्ये त्याने पुढे लिहिले की, 'मला असाध्य आजार झाला आहे. मला आता पुढचं माझं भविष्य दिसत नाही. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी माझ्या कुटुंबाला संकटात सोडू शकत नाही. मी सर्वांना मुक्त करणार आहे. मी एका क्षणात सर्व संकट दूर करत आहे. माझ्या मागे कोणीही संकटात सापडलेले मला चालणार नाही. माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. असाध्य डोळ्यांच्या आजारामुळे मला असे पाऊल उचलावे लागले आहे. शिकवणे हा माझा व्यवसाय आहे. मग डोळे नसताना मी काय करू?"
डॉक्टर डिप्रेशनमध्ये होते
डॉ. सुशील गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले, मात्र डॉ. सुशील डिप्रेशनमध्ये का होता हे मात्र कुटुंबीयांनी सांगितले नाही.