उदयपूर : भारतात कोरोनाचे रुग्ण दुप्पट वेळानं वाढत आहेत. अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू, छोटा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर काही राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. ओमायक्रॉनमुळे दुसरा बळी गेल्याचा दावा केला जात असताना आता त्यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचं संक्रमण झालेला रुग्ण गेल्याची पहिली घटना घडली होती. त्यानंतर आता उदयपूरमध्ये ओमायक्रॉनचं संक्रमण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


देशात कोरोनासोबत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत देशात एक हजाराहून अधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे.


रुग्णालयात सुरू होते उपचार


राजस्थानच्या उदयपूरमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर महाराणा भूपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 


75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला ताप, सर्दी अशी लक्षणं होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर जीनोम सीक्वेंसिंग केलं. 25 डिसेंबरला रिपोर्ट आला त्यावेळी ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 


डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण 


सीएमएचओ डॉ. दिनेश खराडी यांनी रुग्णाच्या मृत्यूची माहिती देत असताना महत्त्वपूर्ण काही गोष्टी सांगितल्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या वृद्ध रुग्णाचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाला नाही. तर पोस्ट कोव्हिडमुळे झाला आहे. न्यूमोनिया आणि इतर आजारांमुळे त्याचा मृत्यू झाला. मृत रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 


याशिवाय रुग्णाला हायपो थायरॉईडीझमचाही त्रास होता. या वृद्ध व्यक्तीनं लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तो घरीच होता मात्र ताप आणि सर्दी झाल्याने त्याची प्रकृती अचानक खालवली. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू ओमिक्रॉन मृत्यू मानला जाणार नाही, असे खराडी यांनी स्पष्टपणे सांगितले.