Omicron मुळे देशात धोक्याची घंटा, आर-व्हॅल्यू वाढल्याने यंत्रणा सतर्क
ओमायक्रॉन व्हायरस चिंता वाढवत चालला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबई : देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोका वाढला आहे. सरकारची यामुळे चिंता वाढलीये. काही राज्यांमध्ये, कोरोना व्हायरसचे आर-व्हॅल्यू वाढू लागले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना नियंत्रणात राहण्यासाठी R चे मूल्य 1 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त असल्यास तो संसर्ग पसरण्याचे लक्षण मानले जाते. (Corona virus R value increase in india)
एपिडेमियोलॉजिस्ट प्रोफेसर डॉ. गिरीधर बाबू यांच्या मते, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेशमध्ये आर-व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, उत्तराखंड, त्रिपुरा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि नागालँडमध्ये आर-मूल्य वाढू लागले आहे.
या राज्यांमध्ये संसर्ग पसरू लागल्याचे हे लक्षण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चमध्ये आर-व्हॅल्यू 1.37 होते. एप्रिलनंतर हे मूल्य कमी होत गेले. त्यामुळे देशातील कोरोनाचे रुग्णही कमी होऊ लागले आहेत. सध्या, बिहारमध्ये देशात सर्वाधिक आर-व्हॅल्यू आहे. गेल्या एका आठवड्यापासून आर-व्हॅल्यू 1 च्या वर आहे.
आर-व्हॅल्यू म्हणजे काय
आर-व्हॅल्यू म्हणजे व्हायरसचे पुनरुत्पादन मूल्य. यावरून असे दिसून येते की कोरोनाची लागण झालेली व्यक्ती नंतर किती लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकते. जर आर-व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ त्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जर हे मूल्य 1 पेक्षा कमी असेल तर प्रकरणे कमी होत आहेत. उदाहरणार्थ, जर 100 लोकांना संसर्ग झाला असेल आणि व्हायरस इतर 100 लोकांमध्ये पसरत असेल, तर R-मूल्य 1 असेल. जर हे लोक जास्त संसर्ग करत असतील तर हे मूल्य वाढेल. आर व्हॅल्यूमध्ये वाढ सूचित करते की संक्रमित व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये विषाणू पसरवत आहे. त्यामुळे हळूहळू संसर्ग वाढू लागतो आणि मोठी लोकसंख्या त्यात अडकते.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या त्याची तीव्रता दर्शवते. जर कोरोनाची प्रकरणे वाढत असतील आणि बहुतेक रुग्ण घरीच बरे होत असतील तर याचा अर्थ व्हायरसचा प्रभाव कमी आहे. अशा स्थितीत साथीचे आजार सहज आटोक्यात येतात, पण बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयांमध्येही रुग्णांची वर्दळ वाढत असेल, तर संसर्गामुळे लोक गंभीर आजारी पडण्याचे लक्षण आहे. जो धोक्याचा संकेत आहे.