दिल्लीतील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांचा मुलगा पाण्याने भरलेल्या टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये (Washing Machine) पडला होता. इतकंच नाही तर तब्बल 15 मिनिटं तो पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होता. सात दिवस कोमा आणि व्हेंटिलेटर व त्यानंतर 12 दिवस वॉर्डमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानतंर चमत्कारिकपणे तो बचावला आहे. वसंत कुंज येथील फोर्टिज रुग्णालयात (Fortis Hospital) चिमुरडा भरती होता. चिमुरड्याची प्रकृती आता चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मशीनमधून बाहेर काढल्यानंतर संपूर्ण शरीर निळं पडलं" 


चिमुरड्याला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. त्याचं शरीर थंड पडलं होतं, तसंच श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितलं की, चिमुरड्याचं शरीर निळं पडलं होतं. ह्रदयाचे ठोकेही कमी होते. 


"खुर्चीवर चढून मशीनमध्ये पडला"


डॉक्टरांनी मुलाच्या आईच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलगा जवळपास 15 मिनिटं वॉशिंग मशीनमध्ये पडून होता. महिला काही काळासाठी घराबाहेर गेली होती. घरात आली असता तिला मुलगा कुठेच दिसत नव्हता. खुर्चीचा आधार घेऊनच तो मशीनमध्ये पडला होता. 


डॉक्टर नागपाल यांनी सांगितल्यानुसार, "मुलगा 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ पाण्यात असावा, अन्यथा त्याची जीव वाचला नसता. तरीही चिमुरड्याचा जीव वाचला हे चमत्कारापेक्षा कमी नाही".


'मुलाला झाला होता केमिकल न्यूमोनिटिस'


बालरोग विभागाचे डॉक्टर हिमांशी जोशी यांनी सांगितलं की, मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं होतं. साबणाचं पाणी असल्याने त्याच्या अनेक अवयवांना हानी झाली आहे. त्याला केमिकल न्यूमोनिया (बॅक्टेरियल न्यूमोनिया- फुफ्फुसाची जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे) विकसित झाला होता. नंतर त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनही झालं होतं. 


'आपल्या आईला ओळखत नव्हता'


मुलाला आवश्यक ते एंटीबायोटिक्स आणि इतर औषधं देण्यात आल्यानंतर तो बरा झाला. यानंतर हळूहळू तो आपल्या आईला ओळखू लागला आणि त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवरुन हटवण्यात आलं. 


बाळाला सात दिवस ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याला 12 दिवस वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. सध्या बाळ सुरक्षित आहे. पण त्याच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत.