एक दिवा जवानांसाठी, दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींचं आवाहन
पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली : शुक्रवारी दिवाळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सैनिकांना अभिवादन म्हणून प्रत्येकाने दीप प्रज्वलन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. शब्दांनी त्यांच्या अदम्य धाडसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येत नाही. त्यांनी सीमेवर तैनात सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटले की, 'मित्रांनो, उत्सवाच्या वेळीसुद्धा आपण भारत मातेची सेवा आणि सुरक्षा प्रदान करणारे शूर सैनिक आठवले पाहिजेत. त्यांच्या आठवणीनंतरच आपण दिवाळी साजरी केली पाहिजे. भारत मातेच्या या शूर मुला-मुलींसाठी आपण दिवा लावायला हवा.'
ते म्हणाले की, जरी सर्व सैनिक आणि कोविड-१९ वर पुढे राहून काम करणारे नागरिक आपल्या कुटुंबियांसह सण साजरा करण्यासाठी घरी नसतील, तरी संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. पंतप्रधानांनी अलीकडेच प्रसारित झालेल्या 'मन की बात'ची ऑडिओ क्लिपही पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी लोकांना दिवाळीच्या दिवशी सैनिकांसाठी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते.