नवी दिल्ली: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी केले आहे. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात नक्कीच काहीतरी मोठे पाहायला मिळेल. यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूकंप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भूकंप झाला. आता कोणाचा भूकंप होणार, हे आपण पाहूच. मात्र, कोणता ना कोणता भूकंप नक्की होणार, असे रामदास आठवले यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी रामदास आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारला टोलाही लगावला. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेली टीका शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेले सरकार बरखास्त करावे. शिवसेना-भाजप महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल, असेही रामदास आठवले यांनी म्हटले. 



तुमच्याशिवाय सरकारचे अडेल या भ्रमातून बाहेर पडा; शिवसेनेचा ज्येष्ठ नेत्यांना इशारा


दरम्यान, आजपासून नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली आहे. तत्पूर्वी रविवारी शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत आणि सावरकरांच्या अवमानाच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. दुसरीकडे, आम्ही वचन पाळणारे लोक असून शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत भाजपच्या सावरकरप्रेमावर प्रश्न उपस्थित केले होते.



हिवाळी अधिवेशनांतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. मात्र, या विस्तारानंतर मंत्रिपद मिळालेले अनेक नेते नाराज होऊ शकतात. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी चढाओढ आहे. यावरून शिवसेनेने नाराजीही व्यक्त केली होती. मित्रपक्षांनीही मलईदार किंवा वजनदार खात्यांचा आग्रह सोडावा, असे शिवसेनेनेच म्हणणे आहे. ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ घडणार का, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.