कांद्याची माळ गळ्यात घालून वधुवरांचे सात फेरे
लग्नाला आलेल्या वधु वरांच्या मित्रपरिवाराने एक किलो कांदे गिफ्ट दिले आहेत.
नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या किंमतींची देशभरात चर्चा आहे. कधीकाळी कांद्याच्या दरवाढीमुळे काँग्रेसवर टीका करणारे भाजप नेते आता सत्तेत आल्यावर आम्ही कांदा खात नाही अशी पळवाट काढत आहेत. देशात अशी गंभीर स्थिती असताना कांद्यावरुन मिम्स देखील बनत आहेत. मौल्यवान वस्तू म्हणून लोकं एकमेकांना कांदा भेट देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संसदीय क्षेत्र असलेल्या वाराणसीच्या साकेत नगरमध्ये एक लग्न कांद्यामुळे चर्चेत आले आहे. या लग्नात वधु वरांनी एकमेकांना कांदा लसुणाची माळ घालून साता जन्माची शपथ घेतली. एवढंच नव्हे तर आलेल्या पाहुण्यांनी देखील कांदाचं भेटवस्तू म्हणून दिला. वाराणसीच्या भाजी मार्केटमध्ये कांदा ८० ते ९० रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये देखील असाच एक मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे लग्नाला आलेल्या वधु वरांच्या मित्रपरिवाराने एक किलो कांदे गिफ्ट दिले आहेत. हे पाहुन लग्न मंडपात आनंदाचे वातावरण पसरले. समोर असलेल्या लोकांना हसू आवरत नव्हते.
बेडशीटवर कांदे फ्री
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उल्हासनगरमधील एका दुकानदारानं चांगलीच शक्कल लढवलीय. हँडलूम खरेदीसोबत एक किलो कांदे मोफत देण्याची ऑफर दुकानदारानं दिलीय. उल्हासनगरच्या शिरू चौक भागातील शीतल हँडलूमच्या दुकानात ही ऑफर सुरु आहे. एक हजार रुपये किमतीचे बेडशीट किंवा टॉवेल विकत घेतल्यास त्या ग्राहकाला एक किलो कांदे फ्री दिले जातायत. अनेक ग्राहक त्यांच्य़ा या ऑफरचा लाभ घेताना दिसतायत.