Indian State That Does Not Have A Capital:  प्रत्येक राज्याला एक राजधानीचं शहर असतं. मात्र भारतात सध्या एक असं राज्य आहे ज्याला राजधानीच नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच वाटेल. पण हे खरं आहे. या राज्याचं नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या राज्यामध्ये अडीच कोटींहून अधिक भारतीय राहतात. पण या राज्याचा कारभार राजधानीशिवाय सुरु आहे. याच राज्यासंदर्भात जाणून घेऊयात...


राजधानीचं महत्त्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सर्व प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी, सरकारची अधिवेशनं भरवण्यासाठी, अधिकाऱ्यांना तसेच सर्वच यंत्रणांना एक केंद्रित ठिकाण असणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळेच राजधानीच्या शहराला अनन्यसाधारण महत्त्व असतं. अगदी मानवी संस्कृतीमध्ये कोणत्याही टप्प्यात पाहिलं तर कोणत्याही राजवटीचा इतिहास आपल्याला राजधानीचं महत्त्व किती असतं हे अधोरेखित करुन सांगतो. राज्याच्या संस्कृतिक, आर्थिक, सामाजिक विकासाबरोबरच धोरणात्मक निर्णय क्षमता आणि विकासासाठी राजधानी महत्त्वाची असते. राज्याची ओळख ही त्या राज्याची राजधानी असते असंही म्हटलं जातं. त्यामुळेच राजधानी ही हवीच. मात्र हीच राजधानी नसलेलं एक राज्य सध्या भारतात आहे.


कोणत्या राज्याला आणि का नाही राजधानी?


राजकीय आणि प्रशासकीय निर्णयांमुळे सध्या राजधानीशिवाय काम करत असलेल्या या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश! खरं तर या राज्याचे 2014 साली विभाजन झालं आणि त्यामधून तेलंगण राज्य वेगळं झालं. राज्याच्या विभाजनानंतर हैदराबाद हे शहर दोन्ही राज्यांची संयुक्त राधनाधीचं शहर असेल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आंध्र प्रदेशची वेगळी राजधानी 10 वर्षांमध्ये उभी करुन नंतर ते शहर आंध्र प्रदेशची राजधानीचं शहर असेल असं ठरवण्यात आलं. म्हणजेच 2024 पासून हैदराबादला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणता येणार नाही असं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे 10 वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही राजधानी तयार न झाल्याने आता राज्याला राजधानीशिवाय काम करावं लागत आहे. खरं तर हैदराबादला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी जाहीर केल्यानंतरही आंध्र प्रदेशने घाईघाईत आपली राजधानी वेल्लागपुडी येथे हलवली होती. मात्र आता 2 जून 2024 रोजी 10 वर्षांची डेडलाइन संपल्याने या तात्पुरत्या राजधानीलाही पूर्णपणे विकसित करण्यात आलं नाही आणि पर्यायी राजधानीही उभी राहिली नाही त्यामुळे आता हे राज्य मागील 10 दिवसांपासून राजधानीशिवाय आहे.


राजधानीचं काय करणार?


मागील 10 दिवसांपासून राजधानी नसलेल्या आंध्र प्रदेशच्या राजधानीची उभारणी सध्या गुंटूर जिल्ह्यामध्ये केली जात आहे. कृष्णा नदीच्या काठावर अमरावती हे राजधानीचं शहर म्हणून विकसित केलं जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांनी राज्याचं विभाजन झाल्यानंतर अमरावती राज्याची नवी राजधानी असेल असं जाहीर केलं होतं. त्यांनी 2015 मध्ये 51 हजार कोटी रुपयांचा खर्च राज्याची राजधानीचं शहर उभं करण्यासाठी येईल असं म्हटलं होतं. नायडू यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन 33 हजार एकर जमिनीचं अधिग्रहण केलं. सिंगापूरमधील एका कंपनीच्या मदतीने त्यांनी हे राजधानीचं शहर उभारण्यास सुरुवात केली. 


काम थांबलं...


मात्र 2019 मध्ये चंद्रबाबूंचा पक्ष व्हा एस जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाविरुद्ध निवडणुकीत पराभूत झाला. त्यानंतर रेड्डी यांनी अमरावतीचा नायडूंचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित केला. नवीन राजधानीचं बजेटही त्यांनी कमी केलं. त्यामुळे सिंगापूरची कंपनी या कामातून बाहेर पडली. त्यावेळेचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याला तीन राजधानी असाव्यात असं नियोजन केलं. मात्र यावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई सुरु झाली जी अजूनही सुरुच आहे. यंदाच्या वर्षी चंद्रबाबूंचा पक्ष लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याबरोबरच विधानसभेची निवडणूक बहुताने आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आला आहे. त्यानंतर आता अमरावतीचं काम पुन्हा जोरात सुरु झालं आहे. सध्या या ठिकाणावरुन काम सुरु असलं तरी त्याला अधिकृत राजधानीचा दर्जा देण्यात आलेला नाही. या ठिकाणी अनेक प्रशासकीय इमारतींचं काम अद्याप सुरुच आहे. आता सरकार बदलल्याने या कामाला वेग आला आहे.