`ही मुंबई आहे, आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे`
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप
नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
EDकडून शिवसेना नेत्यांना (Shiv Sena leader) जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्याकडे तक्रार केली आहे.
मुंबईचा 'दादा' शिवसेना
मुंबई पोलिसांकडे ईडीची (Enforcement Directorate) चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ही मुंबई आहे हे लक्षात ठेवा, ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तुम्ही पहात राहा काय होतंय आता, याचे सूत्रधार कोण आहेत, ईडी ऑफिसमध्ये जाऊन बेकायदेशीरपणे कोण लोकं बसतायत आणि ऑपरेट करताय.
ईडीच्या ऑफिसमध्ये इतरांना प्रवेश नाहीए, पण दोन तीन लोकं आहेत ते ईडीच्या ऑफिसमध्ये बसतात, ते ईडीला ब्रीफ करतात, ते ईडीला आदेश देतात, कोणाला बोलवायचं आहे, कोणाला टॉर्चर करायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आव्हान करतो, आणि त्यांना माहित आहे मला काय सांगायचंय ते असा इशारा देत खोटे पुरावे निर्माण करतात, रोज सकाळी कोण तरी एक माणूस उठतो, आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्याच्यावर ईडी करावाई करतं, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे.
ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव
शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केले जात आहे, अशी तक्रार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राऊत यांनी पत्र लिहून ही तक्रार केली आहे. एवढंच नाही तर माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे पुढील अनेक वर्ष तुरूंगात जाल, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावाही या पत्रात राऊत यांनी केला आहे. आपल्याविरोधात साक्ष देण्यासाठी 28 जणांना ताब्यात घेऊन यंत्रणांकडून धमकावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.