गोविंद तुपे, झी 24 तास मुंबई : काळ्या जादूच्या विळख्यात महाराष्ट्रातील बहुतेक व्यापारी अडकले आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची हातचलाखी करुन बरेच भोंदू बाबा, लोकांना मूर्ख बनवत आहेत. परंतु या सगळ्याचा झी 24 तासकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्यामुळे हे भोंदू बाबा कशा पद्धतीनं सर्वसामान्यांना मूर्ख बनवत हे सांगणार आहोत. ज्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच या बाबांनी केलेली जादू कशी केली असा सवाल देखील तुमच्या मनात उपलब्ध राहाणार नाही, चला तर मग झी 24 तासच्या ऑपरेशन तुम्बाडबद्दल जाणून घेऊ या.


पितळेच्या आणि तांदळाच्या भांड्याची कमाल, ज्याला कोट्यवधींची किंमत



कोरीव नक्षीकाम असलेलं पितळेचं भांडं हे साधंसुधं भांडं नाही, गुप्तधनाच्या बाजारात या भांड्यांची किंमत भरपूर आहे. तब्बल शेकडो कोटी रूपये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या भांड्यात असं आहे तरी काय?


तर या भांड्याच्या मध्यभागी एक विशिष्ट प्रकारचा अनमोल खडा बसवण्यात आलाय. त्यामुळे भांड्यात पाणी ओतलं की रंगीबेरंगी लाईट दिसायला सुरूवात होते. या भांड्याला ना कुठे इलेक्ट्रीक सप्लाय आहे ना कुठं बॅटरीची व्यवस्था आणि त्याच्या अदभूत गुणधर्मामुळे नासा, इस्त्रो सारख्या संस्थेत या भांड्याला मोठी मागणी असल्याचा दावा हे बाबा करतात.


तांदळू खेचणाऱ्या भांड्याला का आहे इतकं महत्व?


या भांड्यावर सुई, ब्लेड सारख्या वस्तू ठेवताच त्या तडतड उडू लागतात. होकायंत्राचा तर अक्षरश: तोलच सुटतो. भांड्यावर पाण्याचा ग्लास ठेवला तर ग्लासातल्या सुया देखील गरागरा फिरू लागतात. या भांड्यावर लोहचुंबकसुद्धा स्थीर राहत नाही. 


ईस्ट इंडिया कंपनीचं नाव असलेला हा 1818 सालातला तांब्याच्या भांड्याच्या जवळ नुसती सुई जरी नेली तरी ती थरथरायला लागते. हे भांडं विशिष्ट अंतरावरून तांदूळही खेचून घेतं. भांड्याजवळ नट नेला तर तो देखील गरगरा फिरायला लागतो. हे कमी होतं म्हणून की काय, या भांड्यावर माचीसची काडीसुद्धा पेट घेते. काळ्या जादूच्या बाजारात या भांड्याची किंमत तब्बल 1500 कोटी रूपये इतकी आहे.


दुर्मीळ नाण्याला देखील मागणी


आता हे दुर्मीळ नाणं पाहिलंत. हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा असलेलं युकेल वन नाणं अदभूत आहे. या नाण्यात लाईट लागते. लोहचुंबक किंवा इतर कोणत्याही वस्तू त्याला चिटकत नाहीत. या नाण्याची किंमत तब्बल 300 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येतंय.


काचेच्या भांड्यालाही लोखांची किंमत


साधं पॅकिंग असलेलं हे आणखी एक काचेचं भांडं पाहा. या भांड्यात सुया ठेवल्या की, त्या नाचू लागतात. एवढच नाही तर चालू बॅटरीची लाईट काही सेकंदात डिम होऊन बॅटरी बंद पडते.


आता याला चमत्कार म्हणायचं की विज्ञानाचा अविष्कार?


गुप्तधनाच्या बाजारात या वस्तूंना आरपी म्हणजे राईस पुलर या नावानं ओळखलं जातं. या वस्तू टेस्ट करण्याची पद्धतही वेगळी आहे.


यातली एक पद्धत म्हणजे डॉल्फिन किंवा निडल टेस्ट यात RPच्या जवळ काचेच्या भांड्यात पाणी घेऊन सुया टाकल्या की त्या सुया नाचू लागतात. जुन्या पद्धतीच्या बॅटरीतील बल्ब बंद होतो. यातली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे एमआर आणि आरआर...एमआर म्हणजे मेटल टू राईस आणि आर आर म्हणजे राईस टू राईस, या टेस्टमध्ये ह्या अँटिक भांड्यापासून विशिष्ट अंतरावर ठेवलेला तांदूळ आपोआप खेचला जातो. विशेष म्हणजे हा खेचलेला तांदूळ पुन्हा विशिष्ट अंतरावर ठेवला की तो दुसरा तांदळाला खेचतो.


कोट्यवधी रूपयांच्या या अघोरी वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी कंपनी किंवा फंडर बोलवावा लागतो. त्यासाठी त्यांच्याकडे डिपॉझिट म्हणून 15 ते 20 लाख रूपये ठेवावे लागतात. आरपी टेस्ट करणारा संशोधक, टेस्टिंगसाठी लागणारं किट याचाही खर्च 10 ते 15 लाखांच्या घरात असतो. 
आरपीच्या विशिष्ट टेस्ट सिद्ध झाल्या नाहीत, तर करारानुसार कंपनीकडून एक रूपयाचाही परतावा दिला जात नाही. त्यामुळे एका रात्रीत कोट्यधीश होण्याच्या नादात कित्येकांना 25 ते 30 लाखांचा चुना लागला आहे.


आता तुम्ही म्हणाल की या वस्तूंना कोट्यवधींचा भाव मिळण्यामागचं कारण काय?


या वस्तूंमध्ये रेडिएशन असल्यामुळे इस्त्रो, नासासारख्या संशोधन करणाऱ्या संस्था कोट्यवधी रूपये मोजतात असा दावा केला जातो. एवढंच नव्हे तर डीआडीओसारख्या संस्थांमध्ये या वस्तूंचं टेस्टिंग केलं जात असल्याचं या धंद्यातल्या लोकांचं म्हणणंय. यावर आम्ही पोलिसांशी संपर्क साधल्या, ज्यानंतर त्यांनी धक्कादायक खुलासा केला.


ह्या अघोरी भांड्यांच्या नादाला लागून केवळ मध्यमवर्गीयच नव्हे, तर मोठ-मोठे उद्योगपतींनाही वेड लागलंय आणि विशेष म्हणजे पुण्यासारख्या शहरात हा धक्कादायक प्रकार घडला.


आरपी भांड्यांच्या मदतीनं गुप्तधन मिळवण्याचा एकही व्यवहार यशस्वी झाल्याचं आजतागायत कुणीही ऐकलं किंवा पाहिलेलं नाही. तरीही केवळ चमत्कारिक भासवणाऱ्या व्हिडीओंच्या आकर्षणाला बळी पडून अनेक जण उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळेच झी २४ तासनं या लाखो-करोडांना गंडा घालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय.


मोठ-मोठ्या शहरांमध्ये उच्चशिक्षित लोकांमध्येही हे प्रकार सर्रास सुरू असल्यामुळे पुरोगामी आणि विज्ञानवादी असलेला महाराष्ट्र अजूनही अंधश्रद्धेच्या सापळ्यात अकडलाय. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी बंदोबस्त करणं गरजेचं आहे.