नवी दिल्ली: देशाच्या विविध राज्यांमधून आलेल्या लाखो शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. या मोर्चाच्या व्यासपीठावर राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी हे विरोधी पक्षाचे नेते एकत्र आले होते. सकाळी दहाच्या सुमारास निघालेला हा मोर्चा पावणेबाराच्या सुमारास संसद मार्गावर पोहोचला. तिथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झाले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, शेतकरी मोदी सरकारकडून भेट नव्हे तर त्यांचा हक्क मागत आहेत. आपल्याकडे विविध राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र, शेतकरी आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न येईल तेव्हा विरोधी पक्ष एकजुटीने उभे राहतील. हा मोर्चा शेतकरी आणि तरुणांच्या विराट शक्तीचे दर्शन घडवणारा आहे. तुम्ही त्यांचा आवाज दडपू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 






जे सरकार शेतकरी आणि तरुणांचा अपमान करेल त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच देशातील लोकांना अन्न मिळते. हा देश कोणत्याही एका व्यक्ती किंवा सरकारमुळे नव्हे तर महिला, तरुण आणि शेतकऱ्यांमुळे चालतो. जर सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करु शकते तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कोणालाही घाबरायची गरज नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.