मुंबई : दिल्लीत जे घडले त्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दोन महिन्यांपासून दाखवलेला संयम लक्षात घेता केंद्रातील सरकारने ( central government) सामंजस्याने सकारात्मक वाटाघाटी करायला हव्या होत्या, अशी टीका राष्ट्रवादी (NCP) काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. सरकारने घातलेल्या जाचक अटींमुळेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचंही त्यांनी सांगितले. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असा आरोपही त्यांनी केला. तर दिल्लीत गेल्यानंतरच आंदोलने का हिंसक होतात, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबमधील लोकांना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पाहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक मोदी सरकारने करु नये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.



कृषी विधेयके संसद समितीकडे न पाठवता गोंधळात सभागृह मंजूर करण्यात आली तेव्हाच मला वाटत होते की हे बिघडू शकते, कुठेतरी शेतकरी वर्गाकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. गेल्या 50 ते 60 दिवस पंजाब भागातील शेतकऱ्यांनी या कायद्यांसंबंधी भूमिका घेतली आणि अत्यंत शांततेत त्यांनी आंदोलन केले. इतका काळ संयम दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका घेत असताना केंद्राने यावर संयमाने भूमिका घ्यायची होती. मात्र, सरकारला आपला स्टँड सोडायचाच नाही त्यामुळे सर्व चर्चा अपयशी झाल्या, असे पवार म्हणाले.