लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या `राजकीय` वक्तव्यावर ओवेसींचा निशाणा
लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत सध्या उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली : लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत सध्या उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मनसुब्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीन आणि पाकिस्तान भारताशी थेट युद्ध करु शकत नाही म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष युद्धाचा मार्ग अवलंबला आहे, असं रावत म्हणाले. उत्तर पुर्वेकडून भारतात येणाऱ्या निर्वासित ही चीनची चाल असल्याचा आरोप रावत यांनी केला आहे.
या दौऱ्यावेळी रावत यांनी एका राजकीय पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद ओढावला आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रकारे पाकिस्तानमधून दहशतवादी पाठवण्यात येतात तसंच उत्तर भारतामधलं वातावरण अशांत करण्यासाठी निर्वासितांना भारतात पाठवण्यात येत असल्याचं रावत म्हणाले. व्होटबँकेचं राजकारण यासाठी कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली.
AIUDF नावाचा राजकीय पक्ष जोमानं वाढत आहे. या पक्षाचा विकास भाजपच्या तुलनेत जास्त झाला आहे. जनसंघाचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर AIUDF जोमानं वाढत असल्याचं वक्तव्य रावत यांनी केलं.
ओवेसींचा निशाणा
जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. लष्कर प्रमुखांनी राजकीय टिप्पणी करु नये. कोणत्याही पक्षाविषयी भाष्य करणं हे त्यांचं काम नाही. राजकीय पक्ष स्थापन करायला लोकतंत्र आणि संविधान परवानगी देतं. लष्कर नेहमी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारच्या अंतर्गत काम करतं, असं ट्विट ओवेसींनी केलं आहे.
AIUDF कोणता पक्ष?
AIUDF म्हणजे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट. आसाममध्ये असलेला हा पक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी ऑक्टोबर २००५ मध्ये सुरु केला. मुस्लिमांच्या प्रतिनिधीत्वाचा दावा करणाऱ्या या पक्षानं आसाममध्ये जम बसवला. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडुकीत या पक्षाला १२६ पैकी १३ जागा मिळाल्या. तर लोकसभेमध्ये या पक्षाचे तीन खासदार निवडून आले.