घरगुती जेवण द्या; चिदंबरम यांची न्यायालयाकडे पुन्हा विनंती
यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सर्वांना सारखेच जेवण मिळेल, असे सांगत चिदंबरम यांची विनंती फेटाळून लावली होती.
नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना आपल्याला घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कारागृहात सर्वांना सारखेच जेवण मिळेल, असे सांगत चिदंबरम यांची विनंती फेटाळून लावली होती.
चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, चिदंबरम हे ७४ वर्षांचे आहेत. ही बाब ध्यानात घेऊन त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी, असे सिब्बल यांनी म्हटले होते.
त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विरोध केला होता. चौटाला हेदेखील राजकीय आणि वृद्ध कैदी आहेत. त्यांनाही तुरुंगातीलच जेवण दिले जाते. प्रशासन कोणताही भेदभाव करू शकत नाही, असे तुषार मेहता यांनी सांगितले होते.
'चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही'
२१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.