ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या वागणुकीचा निषेध व्यक्त होत, असताना सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी मुक्ताफळं उधळलीत. संसदेतही या मुद्यावरुन जोरदार गदारोळ झाला. तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुरुवारी संसदेत निवेदन देणार आहेत. 


वादग्रस्त विधानामुळे वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला दिलेल्या वागणुकीवरुन देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. तर दुसरीकडे सपा खासदार नरेश अग्रवाल यांच्यासारखे नेते अशाप्रकारे मुक्ताफळं उधळत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत. या प्रकरणी नापाक पाकिस्तानचा निषेध करण्याऐवजी नरेश अग्रवाल यांना आपण काय बोलतोय यांचं भानही राहिलं नाही. त्यांच्या या विधानाचा भाजपने खरपूस समाचार घेतलाय. 


सार्वत्रिक टीकेनंतर मात्र अग्रवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 


लोकसभेतही पडसाद


दुसरीकडे कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या वागणूकीचे पडसाद लोकसभेतही उमटले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कामकाज सुरु होताच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. प्रश्नोत्तराच्या तासात पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी सावंत यांच्या घोषणांना पाठिंबा दिला.


पाकिस्तानचा कांगावा


संपूर्ण देशात आणि संसदेत गोंधळ सुरु असताना पाकिस्ताननं पुन्हा एकदा कांगावा केलाय. जाधव यांच्या पत्नीच्या बूटात हेरगिरी करण्यासाठी वापरली जाणारी चीप होती. त्यामुळेच त्यांचा बूट जप्त करण्यात आल्याच्या बोंबा पाकिस्ताननं मारल्यात. मात्र पाकिस्तानचे सगळे दावे निराधार असून ते नक्की कुलभूषण जाधव होते असा सवाल उपस्थित करत उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणाला नवा ट्विस्ट दिलाय. 


पाकिस्तानच्या वागणुकीवर संताप


गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाकिस्तानच्या वागणुकीवर तीव संताप व्यक्त होतोय. पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणीही होतेय.  त्यामुळे आता या प्रकरणी सरकार काय भूमिका घेणार याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात.