नवी दिल्ली: पाकिस्तानच्या तुरुंगात असताना माझा खूप छळ झाला. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे माझ्या डोळ्याला दुखापतही झाली होती, असा गौप्यस्फोट हमीद निहाल अन्सारी याने केला आहे. हमीद अन्सारी याची बुधवारी पाकिस्तानने सुटका केली होती. यानंतर तो भारतात परतला. त्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी त्याने आपल्यावर पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्याचे सांगितले. अटक करण्यात आल्यानंतर सुरुवातीला मला निर्जन ठिकाणी असणाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. या ठिकाणी पाकिस्तानी गुप्तचर विभागाचे अधिकाऱ्यांकडून माझी अनेकदा चौकशी करण्यात आली. यावेळी झालेल्या मारहाणीमुळे माझ्या डाव्या डोळ्याला दुखापतही झाली होती. मात्र, यानंतर डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले, अशी माहिती त्याने स्वराज यांना दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीवेळी अन्सारी याने आपल्याला आयुष्यात नव्याने उभे राहायची इच्छा व्यक्त केली. मला नोकरी करायची आहे. जमल्यास लग्नही करायचा माझा विचार असल्याचेही त्याने सांगितले. ३३ वर्षीय हामिद अन्सारी मुंबईचा रहिवासी आहे. त्याला पाकिस्तानातील पेशावरमधील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. २५ डिसेंबर २०१५ मध्ये त्याला पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने सुनावलेली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.


अन्सारीची फेसबुकवरील ऑनलाईन चॅटिंगदरम्यान एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. त्यासाठी त्याने आपल्याला अफगाणिस्तानात काम मिळाल्याचे घरच्यांना सांगितले आणि तो तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा अफगाणिस्तानला गेला त्यानंतर तिथून तो बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानात पोहोचला होता. दरम्यान, त्याचा हा अवैध प्रवास पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या रडावर आला. त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपखाली ताब्यात घेतले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्य कोर्टात त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.