घटनाक्रम... राजौरी, नौशेरामध्ये सकाळी नक्की काय घडलं?
पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर लगेचच भारतीय विमानांनी त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परतावून लावले. यावेळी एफ १६ जातीचे एक विमान पाडण्यातही भारतीय हवाई दलाला यश आले. या विमानाच्या वैमानिकाचा पत्ता लागलेला नाही. पण भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची पाकिस्तानची कृती त्यांना जास्तच महागात पडली आहे.
आम्ही पण भारतीय हद्दीत घुसखोरी करू शकतो, हे दाखवण्यासाठीच आम्ही ही कृती केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर भारताची दोन विमाने पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
बुधवारी सकाळी नक्की काय घडले?
११.३२ - पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. नौशेरा आणि राजौरी भागात ही घुसखोरी करण्यात आली.
११.३८ - पाकिस्तानच्या विमानांना परतावून लावण्यासाठी भारतीय विमाने रडारच्या सुचनेनुसार त्या दिशेने गेली. गरज पाडल्यास पाकिस्तानची विमाने पाडण्याचे आदेश हवाई दलाला देण्यात आले
११.३९ - भारतीय विमाने पाहून पाकिस्तानच्या विमानांनी लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी पाकिस्तानच्या विमानांनी बॉम्बही फेकले. त्याचे काही अवशेष राजौरी सेक्टरमध्ये आढळले. पाकिस्तानच्या एका विमानाला पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश मिळाले.
या घटनेनंतर लगेचच केंद्रीय गृह मंत्रालयाने निमलष्करी दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे सुद्धा उपस्थित आहेत. या बैठकीत पाकिस्तानने आज केलेल्या आगळिकीची चर्चा करण्यात येत आहे.