पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, ३ नागरिक जखमी
भारतीय जवानांचं चोख प्रत्त्यूत्तर
श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा आगळीक करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीर मधील पूछ भागातील शाहपूर किरनी आणि कस्वा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसराला लक्ष करण्यात आलं. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचाही मारा केला आहे. या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय उरीमधील रहिवासी परिसरात पाकने गोळीबार केला. यानंतर ५ कुटुंबातील ३४ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
एकीकडे भारताच्या संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु होती. या विधेयकात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी समुदायाला नागरिकत्व देण्यासाठी हे विधेयक आहे. पाकिस्तानच्या संसदेने भारताच्या या विधेयकाविरोधात प्रस्ताव ही मंजूर केला आहे.
याआधी पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय जवानांनी ही त्याला उत्तर दिलं.