Video : `भारत कोणाच्याही पुढे झुकत नाही`; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी भर सभेत केले कौतुक
पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून परकीय चलन संपत आल्याने महागाईने उंची गाठली आहे
दिल्ली : भारतासोबत पाकिस्तानही स्वातंत्र्यांची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतात एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये (pakistan) देशवासीय चिंतेते आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून परकीय चलन संतत आहे. त्यामुळे महागाईने उंची गाठली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी पायउतार झाल्यानंतर सरकारवर महागाईवरुन जोरदार टीका केली आहे. यासोबत ते भारताचे कौतुकही करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे.
इम्रान खान यांनी लाहोरमध्ये एका रॅलीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (s jaishankar) यांचा व्हिडिओ दाखवला आणि भारताचे कौतुक केले. रशियाकडून (russia) स्वस्त इंधन खरेदीसाठी अमेरिकेच्या दबावापुढे ठाम राहिल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले.
इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानसोबतच स्वातंत्र्य मिळालेला भारत जर आपल्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकतो. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार कोणाच्या मार्गावर चालत आहे. इम्रान खान यांनी रॅलीमध्ये सांगितले की, हा तो व्हिडिओ आहे, जो अनेक माध्यमांनी शेअर केला आहे.
सोशल मीडियावर इम्रान खान यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इम्रान खान हे लोकांना संभोतित करताना दिसत आहेत.
"भारत आणि पाकिस्तानला एकाच वेळी स्वातंत्र्य मिळाले आहे. पण दिल्ली स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते तर आपला देश मागे का राहतो," असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे.
रॅलीमध्ये इम्रान खान यांनी सर्वांना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवला आणि सांगितले की, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल न घेण्याचे आदेश दिले होते. पण भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला कसे चोख प्रत्युत्तर दिले ते तुम्ही ऐका.
या व्हिडिओमध्ये जयशंकर म्हणत आहेत की, तुम्ही कोण आहात? युरोप रशियाकडून गॅस खरेदी करत असून लोकांच्या गरजेनुसार आम्ही त्याची खरेदी करू. भारत हा स्वतंत्र देश आहे.
व्हिडीओ दाखवल्यानंतर इम्रान खान यांनी दावा केला की, त्यांच्या आधीच्या सरकारनेही रशियाशी स्वस्त तेलासाठी चर्चा केली होती. पण नंतर हे सरकार सत्तेवर आल्यावर अमेरिकेपुढे नतमस्तक झाले आणि पाकिस्तानला रशियाच्या तुलनेत स्वस्तात तेल मिळू शकले नाही.