नवी दिल्ली : येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या सार्क देशांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देणार असल्याचं आज पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे. २०१६ मध्ये काश्मीरच्या उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी सार्क परिषदेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर परिषदच गुंडाळण्यात आली होती. दर दोन वर्षांनी सार्क देशांची परिषद होते. देशाच्या नावातील आद्याक्षरांच्या यादीनुसार परिषदेचं स्थळ ठरतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये ही परिषद नेपाळची राजधानी काठमांडूत झाली. त्यामुळे २०१६ मध्ये ही परिषद पाकिस्तानात होणार होती. ती परिषद न झाल्यानं आता पुन्हा एकदा पाकिस्तानातच परिषद होणे अपेक्षित आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार सार्क संमेलन होणार की नाही याबाबत अनेक देशांमध्ये राजकीय स्थितीवरुन अंदाज घेतला जात आहे. बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत तर श्रीलंकेत देखील सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे पाकिस्तानात सार्क परिषद होणार नसल्याचंच चित्र आहे.


20व्या सार्क परिषदेचं आयोजन पाकिस्तानात केलं जाणार आहे. 2016 मध्ये पाकिस्तानात याचं आयोजन करण्यात आलं होतं पण भारतासह, बांग्लादेश, भूटान आणि अफगानिस्तानने या परिषदेत भाग घेण्यास नकार दिल्याने ते रद्द करण्यात आलं होतं. यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका लागला होता.


आता पाकिस्तानमध्ये सत्ता बदल झाली आहे. इमरान खान यांच्या नेतृत्वात नवं सरकार सार्क समेंलनासाठी उत्साहीत आहे. सगळ्या देशांनी यात सहभागी व्हावं म्हणून पाकिस्तान आवाहन करत आहे. पण भारताने नकार दिला तर हे संमेलन पुन्हा एकदा रद्द होऊ शकतं. 


सार्कमध्ये सध्या अफगानिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये 18 सप्टेंबर 2016 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे चर्चेचे सर्व मार्ग बंद केले होते.