श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडेही अणूबॉम्ब आहे. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरवर भारताला नियंत्रण करू देणार नाही, असं वक्तव्य फारुक अब्दुल्लांनी केलं आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातल्या उरी सेक्टरमध्ये अब्दुल्ला पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकव्याप्त काश्मीर आपला हिस्सा आहे, हे आपण किती दिवस म्हणणार आहोत? पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या बापाची मालमत्ता नाही. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानमध्ये आहे तर जम्मू काश्मीर भारतात आहे. ७० वर्ष झाली पण त्यांना(भारताला) पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा मिळवता आला नाही, असं अब्दुल्ला म्हणाले.


आज ते (भारत) दावा करतात की पाकव्याप्त काश्मीर आमचा आहे. मग ते पुन्हा ताब्यात घ्या. आम्हीही पाहू, पाकिस्तान एवढं कमजोर नाही. त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत. पाकिस्तानकडेही अणूबॉम्ब आहेत. युद्धाबद्दल विचार करण्याआधी माणूस म्हणून आपण कसं राहणार याचा विचार करा, असा सल्लाही अब्दुल्लांनी दिला.


मागच्या आठवड्यामध्येही पाकव्याप्त काश्मीरबाबत अब्दुल्लांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी फक्त भारतातल्याच नाही तर जगाला सांगतो की पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचं आहे आणि इथला हिस्सा भारताचा आहे. हे बदलणार नाही, कितीही लढाया करा, असं मागच्या आठवड्यात अब्दुल्ला म्हणाले होते.