मोठी बातमी: पाकिस्तान कुलभूषण जाधवांना कॉन्स्युलर एक्सिस देणार
मोदी सरकारच्या राजनैतिक रणनीतीला यश
नवी दिल्ली: भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर एक्सिस देण्याची मागणी पाकिस्तानने गुरुवारी मान्य केली. त्यानुसार उद्या जाधव यांना कॉन्स्युलर एक्सिस देण्यात येईल. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या निर्णयाचा आणि न्यायदान प्रक्रियेवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
२५ मार्च २०१६ पासून कुलभूषण जाधव सलग कॉन्स्युलर एक्सेसची मागणी केली जात होती. २०१६ मध्ये पाकिस्तानातील भारतीय उच्चयोगाकडून जाधव यांच्या अटकेची माहिती मिळाली होती. परंतु, आजपर्यंत पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत (कॉन्स्युलर एक्सेस) दिला नव्हता. त्यामुळे भारताने ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. व्हिएन्ना कराराद्वारे दोन्ही देशातील कैद्यांना राजनैतिक मदत देणे बंधनकारक आहे.
मुंबईच्या पवई परिसराचे रहिवासी असलेले ४९ वर्षीय कुलभूषण जाधव व्यापारानिमित्त इराणला गेले असताना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'ने त्यांचे अपहरण केले. यानंतर कुलभूषण यांना भारताचा 'गुप्तहेर' ठरवत हेरगिरी आणि घातपाती कृत्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या आरोपांखाली दोषी ठरवत एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.