इम्रान खान यांच्या नरेंद्र मोदींना फोन करून शुभेच्छा, मोदी म्हणाले...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना फोन केला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना फोन केला आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. इम्रान खान यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादावर भाष्य केलं. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य वाढवायचं असेल, तर विश्वास वाढवावा लागेल आणि हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण तयार करावं लागेल, असं मोदींनी इम्रान खान यांना सांगितलं.
तर दुसरीकडे इम्रान खान यांनी शेजारी राष्ट्रांना प्रथम प्राधान्य द्यायची आमच्या सरकारची योजना असल्याचं बोलून दाखवलं. भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन गरिबीचा सामना करावा, असं याआधीही बोललो होतो, याची आठवण मोदींनी इम्रान खान यांना करून दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणाची माहिती दिली.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी खराब झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसली होती. या विमानांना परतवून लावताना भारताच्या वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या सीमेत गेले. पाकिस्तानने अभिनंदन यांना बंधक बनवलं. पण भारताचा आंतरराष्ट्रीय दबाव आणि जिनिव्हा करार यामुळे अभिनंदन यांना भारतात परत सोडण्यात आलं.
यानंतर भारतातलं निवडणुकीचं वातावरण ऐन रंगात आलेलं असतानाच, भारतात पुन्हा भाजपचं सरकार आलं तर शांतता नांदू शकते, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरून भारतात वाद निर्माण झाला. विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला होता.